Breaking News
Loading...
Monday, 6 February 2012

Info Post
गेटवरचा तो रोजचा चेहरा
आज थोडा उदास दिसला
आपुलकीन बघत माझ्याकडे
थोडे हळूच उसन हसला

"निघालास ना शेवटी ....
.... खूप आठवशील रं साह्यबा
नवीन मानस .... अन तू साधा
.... स्वत:ची काळजी घे रं बाबा"
.
.
.
रोज त्याने मला चहा पाजला होता
सकाळ-संध्याकाळ सलाम ठोकला होता
मला आवडतो म्हणून डब्यात शिरा आणला होता
रात्री थांबलो होतो
तेव्हा ओरडलाही होता
.
.
.
मी पाकीट काढलं, त्याने हात जोडले
मी पैसे काढले, त्याने डोळे मिटले
"बस सुखात रहा" त्याचे ओठ हलले
आशीर्वादाचे पाठीवर कापरे हात फिरले

मी पाहिलं त्या डोळ्यांत माया साठलेली
सांगताना मला ओसंडून वाहिलेली
मग दोन-चार आसवे खळकन ओघळली
सांडताना मला जाऊ नको म्हणाली
.
.
.
कोण ही माणस, कुठून आली होती
ना ठाऊक केव्हा, कधी जुळली नाती
का लावतात जीव, का वाटतात
आपली का आपल्या दु:खाची, त्यांना काळजी होती
.
.
.
चल येतो म्हणत
मी त्याला ओझरता पाहिला
त्याने मग शेवटचा सलामही केला
त्याचा हात तसाच तिथेच अडकला
काळजावर माझ्या उगीच दगड ठेऊन गेला

मी हताश
तसाच पायऱ्या उतरलो
चाललोय कुठे सारे विसरलो
मागे पहायचं धाडस होईना
नकळत साऱ्या आठवणीत हरवलो

.... गेटवरचा
तो रोजचा चेहरा

कवी : रुपेश सावंत

0 comments:

Post a Comment